Monday, February 23, 2026

मातृपितृ कृतज्ञता सोहळा

 वीस दिवसांपूर्वी आमच्या वडिलांच्या पासष्टा व्या वाढदिवसानिमित्त मातृ पितृ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन आम्ही भावंडांनी मिळून केले होते.

खरं तर वाढदिवस, अभिष्टचिंतन म्हटलं की आपल्या वडिलांच्या पिढीतले सरळ नाही म्हणून मोकळे होतात. आमच्या वडिलांची या वेळी वयाची पासष्टी म्हणून काय करावे या विचारातच असताना निकिताने थोडे जास्तच मनावर घेतले आणि छान मोठा कार्यक्रम करू कीर्तन, भजन ठेऊ असे सांगितले. ठरलं मग आणि सुरुवात झाली तयारीची, सगळी सोयरे मंडळी परमार्थिक असल्याने काही अडचण आली नाही आणि सगळी जुळवाजुळव सहजच झाली.

दाजींना फोन करून कल्पना दिली तसे ताईचे सासरे श्री चिंतामण मंडलिक यांनी फोन फिरवले आणि गायक वादक भजनी मंडळ यांच्या तारखा पहिल्या बुक केल्या. सागर भाऊचे सासरे श्री चंद्रकांत अमूप यांना फोन केला आणि असा कार्यक्रम करायचा आहे म्हटलं तसं त्यांनी बंधू हभप श्री उध्दव महाराज अमूप यांच्या समवेत सविस्तर रूपरेषा तयार दिली. आशिष भाऊ, विष्णुबुवा डोंगरे यांनी हभप श्री राजेंद्र महाराज सदगीर यांचा वेळ घेऊन कीर्तन तारीख दिली. रोख ठोक स्वभावाने आणि वडिलकीच्या नात्याने हे असे करा ते तसे करा, निवेदन कोणी करावे आणि आभार कोणी मानावे सगळच जुळवून दिले. इतर कामे सहजच होऊन गेली. 15 जानेवारी पासून माझा कामाचा व्याप थोडा वाढला होता. पण पवन दादा दिल्लीतून येणार म्हणून जरा दडपण कमी झाले.

धावपळीतून थोडीफार आमंत्रणे चुकली होता करता कार्यक्रमाचा दिवस आला आणि सकाळ पासून दारात हरिनामाचा घोष सुरू झाला. प्रसन्न मुद्रेने सर्वांनी कीर्तन ऐकले.आई वडिलांचा आणि परिणामी त्यांच्याच संस्कारात वाढलेल्या आम्हा भावंडांचा साधेपणा मात्र लपून राहिला नाही आणि कीर्तनकार  हभप श्री राजेंद्र महाराज सदगीर यांनी तो नेमका हेरला आणि त्यावर भाष्य करायला ते अजिबात विसरले नाहीत.

कीर्तन झाले,आई वडिलांचे औक्षण साध्या पद्धतीने पासष्ट दिव्याचे ताट करून पाच सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले, महाराजांनी आपलाच हार आईवडिलांच्या गळ्यात घालत त्यांच्या मनाच्या मोठेपणाची जाणीव करून दिली. भाषणे झाली सरपंच श्री संजय नायकोडी, गावकऱ्यांनी, शेजाऱ्यांनी  जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.

आभार मलाच मानायचे होते पण श्री गणपत डुंबरे यांनी आमच्या कुटुंबाची बालपणीची आठवण सांगितली आणि हृदय भरून आले. मला काही बोलताच आले नाही. सर्व  पाहुणे , मित्रमंडळी छान कार्यक्रम झाला म्हणत आणलेली भेटवस्तू, पुष्पगुच्छ देत फोटो काढत होती. जेवणे झाली आणि कार्यक्रम संपला.आमच्या घरात मात्र आनंद झाला. 


खरं तर खरच गरज होती का या अशा कृतज्ञता सोहळ्याची.

आमच्या आई वडिलांनी खुप कष्टांनी संसार केलाय याची जाणीव आम्हाला आहे. आमच्या आजी आजोबांना आजारातही शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करताना त्यांना आम्ही पाहिलंय. पाचटाच्या घरातून, रॉकेलच्या दिव्यात झालेला त्यांचा संसार आणि आमच्या शिक्षणाची तळमळ आम्ही पाहिलीय. 

चौथी पर्यन्तच  वडिलांचं शिक्षण आम्ही काय शिकावं हे ठरवण्यास समर्थ न्हवत पण आम्ही शिकले पाहिजे यासाठी मात्र पुरेसे होते. कोरडवाहू शेती, अत्यल्प उत्पन्न, आम्हा तीन भावंडांसोबत आई वडिलांच्या जबाबदारीने त्यांनी कधी हौस मौज केलेली आम्ही कधी पाहिलीच नाही. पावसाळा सुरू व्हावा. शेजारील सखाराम बाबा सकाळी सकाळी घरी यावा, आईला चहा ठेवायला सांगत त्यांच्या गप्पा आम्ही कित्येकदा ऐकल्या आहेत. वारी जवळ आलीय आजी आजोबा गावातील मंडळी वारीला जातील. आपलं काय "कुठे जाता पंढरपुरा येथेची पंढरपूर!!" असे म्हणत पहिल्या पावसाबरोबर शेतीची कामे चालू करायची. या मुळे त्यांनी कधी पंढरपूर पहिलेच नाही. स्वाभिमानी एवढे की अजून एक रुपयाचे कर्ज नाही की ना कधी हॉस्पिटल ची पायरी. त्याचं ही तरुणपण त्यांनी गाजवलं की पण वेळेत सावरलेही. घरची विहीर घरीच खोदली अजून चार पाच विहिरी खोदन्यास मदत केली शेजाऱ्यांना. वीस जनावरे सांभाळत पंचवीस एकर शेती सांभाळली, टिकवली, नीट नेटकी केली. आजही गावात अदबीने विचारपूस होताना आम्ही बघतो. आमच्या शाळेतही तशीच प्रतिष्ठा त्यांनी जपलेली आहे. तेव्हा आमचा बाप गरीब होता पण आम्हाला मात्र वेळच्या वेळी वर्कबुक, वह्या मिळत होत्या. आमच्या शिक्षकांनी आमच्या वडिलांची उदाहरणे दुसऱ्यांना देत असताना आमचा ऊर कायम भरून यायचा कारण आम्हाला दिलेल्या वह्या, पुस्तक, वर्कबुक ह्या आम्हाला जून महिन्यात मिळायच्या आणि त्याचे पैसे सरांना दिवाळीत मिळायचे. शब्द कमी पण वजनदार हेही त्यांच्याकडूनच शिकायला मिळालं.आता आमच्या वडिलांची, चुलत्यांची, आत्याची पिढी सगळीच पासष्टी च्या पुढे गेलीय. त्यांनी सगळ्यांनीच आम्हाला खूप जीव लावलाय. कपड्यांपासून शाळेच्या फी पर्यंत सगळच पाहिलंय. आमच्या नानांच्या भरत मारुती काफरे यांच्या पोलिस मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर खरं तर असा कीर्तन कार्यक्रम करायचा असे मनात फार होत पण लॉकडाउन मधी आला. असो आज पंढरपूरचा पांडुरंग घरी आल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळला  याचा आनंद आहे. ह्या सगळ्याच पिढीला निरोगी आयुष्य लाभावे हीच अपेक्षा.

आपण अश्या कोणत्याही प्रकारे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो तर त्यांना नक्कीच आनंदी दिर्घायुष्य लाभेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य सुकर होईल.

डॉ. तुषार काफरे 

No comments:

Post a Comment